Friday, September 12, 2025

कुणी म्हातारी शुभ्र रूपेरी

हिरव्या रानी सोनसकाळी
बालपणीच्या आठवणींची 
वेलीवरती पेटाऱ्यातूनी
पोटी फुटती झरझर झरती 

कुणी म्हातारी शुभ्र रूपेरी
अधर तरंग तरल सुगंधी
स्वप्न उराशी वाऱ्यावरती
घेऊन उडते रानोमाळी 

जरी अधांतरी आणिक हळवी 
आधार शोधी माया ओली 
तरी धुंडाळी माती काळी
कुठे कधी अन् कशी शाश्वती?

कधी अडकते मन काट्यांवर 
मिळे घावांवर ओली फुंकर 
ध्यास श्वास काहीच नुरले 
ऊन पाऊस सारे सरले 

पाठी ओझे न् जखमांचे वळ 
रिक्त हस्ते प्रवास केवळ 
शांत एकाकी शापित वळणे 
माळावर मग उगाच जळणे 

विश्वाचा विश्राम क्षणभर 
विश्वास ढळेना, दिसता हिरवळ 
पुन्हा उफाळून झटकून मरगळ 
दुर उडाली ती पुन्हा कुठवर 


सुरकुतलेल्या सरस्वतीला
लेऊन विटके जिर्ण वल्कल 
गावकुसाच्या त्या वस्तीला 
आत हृदयी आर्त कळवळ

जिव उराशी घेऊन तान्हा 
कडेकपारी, डोंगर रांगा 
जसा मारतो हाका कान्हा 
यशोदेला मग फुटतो पान्हा 

अखंड धडपड अशीच परवड, 
प्रवास खडतर जरी निरंतर 
मनात आशा मधूर शुभंकर 
कुशीत रूजवे कोमल अंकुर

बिज साठवणीची, स्वप्ने धूसर 
पोटी गोंडस रूप तरूवर 
ही निघाली, फुलराणी दुरवर 
पुन्हा उगवाया, त्या खडकावर.... 

No comments:

Post a Comment