बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

ऋतूचा पहिला वाढदिवस !

एक वर्ष झाला सुद्धा ?
काय सांगताय? आश्चर्य आहे....

आत्ता तर ऋतू आईच्या उबदार कुशीत पहुडलेला बघितला होता...

ज्याच्या इवल्या सोनपावलांनी आमच्या घरात
चैतन्याची चौफेर उधळण केलीये ..
ज्याच्या चिमण्या आरोळ्यांनी घर दणाणून गेलंय,
आई बाबांना परत एकदा लहान मुल बनवलंय,
बघता बघता एक वर्ष सरलं सुद्धा !

लाडोबाचे लाड करताना आजोबा आज्जी दमून जातात,
आत्या मावश्या कौतुकाचा वर्षाव करताना थकतात,
काका काकू सगळे श्रम विसरून जातात
ताई- दादा आपली ताईगिरी दादागिरी मिरवायला सज्ज होतात...

जमुयात सगळे पुन्हा, येत्या बुधवारी 
अन मज्जा करूया एकदम भारी 
२५- ऑगस्टला याल ना घरी 
स्थळ तेच, आपली "शिवनगरी" ...

नात आपल जुनंच जरी 
वाटायला हव ना सदैव नव ?
निमित्त्य कुठलही असुद्या हो ..
Celebration तर हवंच हव ...

त्या सुवर्णक्षणांना उजाळा देण्यासाठी,
आशीर्वादांच्या सरीमध्ये चिंब भिजण्यासाठी,
ऋतुराजचा पहिला वाढदिवस !

२५ ऑगस्ट, २०१०, संध्याकाळी ६:३० ला,
ब-१८, शिव नगरी, महात्मा सोसायटी,
कोथरूड.
भ्रमण ध्वनी : ९९२३२०५६१३/४

रविवार, २१ फेब्रुवारी, २०१०

माझं मन

तुझ्यासमोर नेहमी हसणारा मी कधी अश्रू ढाळताना आढळलो तर आश्चर्य वाटून घेवू नकोस...
उसनं अवसान आणून हसणं शिकलोय मी कधीच,
प्रत्येकवेळी समोरच्याला हसवतांना,
मी फसवत असतो स्वताला
मुरड घालण्याची सवयच झालीय
आता माझ्या मनाला..

- प्रदीप

फुलं सुकतील कदाचित...

ही फुलं सुकली असतील कदाचित,
पण त्यामागच्या भावना सुकणार नाहीत कधीच,
ह्यांचा सुगंध नसेल दरवळत आता,
पण धुंद करून गेलाय कधीतरी तो।


रंग फिके पडले असतील कदाचित,
पण अंतरंग बघ ते विटणार नाहीत कधीच,

कारण प्रत्येक फुलाला माहित असतं,
एक दिवस येणार,
क्षणिक सुखाचा सुगंध सांडून
आपण अन सुकणार.

तरीही प्रत्येक  फुल,
नव्या उमेदीनं फुलतं
सुगंध उधळत चहू दिशांना ,
मंद हवेवर झुलतं...

- प्रदीप

माझ्या चारोळ्या!

तुझ्यावरच्या विश्वासाला,
पुरावा नकोय मला,
माझा माझ्यावरचाच विश्वास,
उडत चाललाय हल्ली !
- प्रदीप

माझी कविता

शब्द लगेच दिसून येत नाहीत,
त्यासाठी दुखः थोडं हलक व्हावं लागतं,
रातराणी सारखं ते उमलून यावं लागतं,
त्या मुग्ध सुगंधात सार सार सुसह्य होतं,


आयुष्याच्या पहाटे जुळलेल्या
ह्या दोन ओळी मी जीवापाड जपेल,
मला कुठे ठावूक होतं तुझं असणं,
हीच माझी कविता असेल।


- प्रदीप

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

आयुष्य..

आयुष्य खूप थोडं आहे
म्हटलं तर क्षणाचं,
आयुष्य म्हणजे तळ आहे
हातावरल्या थेंबांच,

आयुष्य म्हणजे स्वप्नं आहे,
आतुरलेल्या कुणाचं,
आयुष्य म्हणजे गोड गाणं,
स्वच्छंद मनाचं.

आयुष्य म्हणजे जग नाही,
तुझं माझं दोघांचं,
आयुष्य म्हणजे चित्र नाही
फक्त दोन रेघांच

अवखळ उघड्या वाटेवरती
गडगडणाऱ्या मेघांच,
आयुष्य म्हणजे तुफान वारं
बेधुंदीच्या वेडाच

सुख म्हणजे हिरवी वाट,
स्वप्नातल्या सत्त्याची,
दुखः म्हणजे केवळ राख,
मनामधल्या हत्त्यांची.

सुख म्हणजे वेडी आशा,
खळाळणार्या ओढ्याची,
कड्यावरून स्वतःला
झोकणाऱ्या वेड्याची.

सुख असं भोगताना,
जाणीव असु दे दुःखाची,
दुःखाच जर केलास गाणं
गरजच काय सुखाची?

- प्रदीप

शनिवार, ९ जानेवारी, २०१०

राहून गेलेल्या गोष्टी !

राहून गेलेल्या गोष्टी !

- लहानशी विहीर खणून केलेली शेती.
-ज्वारीच्या धांडयाची बैलगाड़ी.
-पावसाळ्यात खुपसनिचा खेळ.
-मातीच्या गोळ्यांचा बोंम्ब हल्ला
-सुरपारम्ब्यांचा खेळ
-दिवाळीचा किल्ला
-गणपति बाप्पाची हातानी केलेली मूर्ति
- धामण दरी मधील बोरे चिंचा चारं जांभूळ कैरया ऊसं गोळा करायला जायचंय
- गुर्हाळात जावून आलं टाकलेला उसाचा रस अन गरमागरम गुळ खायचाय.
-आज्जीबाई तूप लोणी चा खेळ
-लगोरी, लंगडी, सागरगोटे इ.
-घरी न सांगता पोहायला जायचंय.
-स्केटिंग करायचं
-तान्हा पोळा साजरा करायचाय.
-दसऱ्याला रावण दहन करायचंय
- पोटभर गरमागरम कांदेपोहे / उकडीचे मोदक खायचे आहेत
- उन्हात तहानभूक विसरून क्रिकेट खेलायचय.
-पडत्या पावसात निसरड्या चिखलात फुटबाल खेळायचाय.
-उबदार गोधडीत शिरून खिडकीतला मुसळधार पाऊस बघायचाय
-लपंडावाचा राज्य घ्यायचाय ... आठवडाभर :)
-बांबू पासून धनुष्य बाण बनवून "रामायण" स्टाईल लढाई करायचीये
-चोर पोलीस खेळत गावभर फिरायचय.
- प्राथमिक शाळेतल्या सरांना शाळेत जावून भेटायचय... पायाला हात लावून नमस्कार करत सांगायचय.. ह्याच वर्गात बसून मार खाल्लाय तुमच्या हातचा :)



चीअर्स!
- प्रदीप

शुक्रवार, १ जानेवारी, २०१०

एक दुर्दम्य विश्वास

मी SB कॉलेज ला लेक्चरर असतांनाची गोष्ट !सकाळी ७:३० चं लेक्चर होतं म्हणून झपझप पावलं उचलत मी कॉलेज कड़े जात होतो.एक छोटी चुणचुणित मुलगी उड्या मारत तिच्या वडिलांचा हात धरून रस्त्याच्या कडेने माझ्यासोबत येत होती. मी कौतुकाने तिच्याकड़े बघत होतो. खुप गप्पा मारत होती ती गोड मुलगी..असेच चालत चालत आम्ही कॉलेज च्या लोखंडी गेट जवळ आलो.गेट नेहमी बंदच असायचं, पण गेटला एक छोटी खिड़की होती तीमधून पलिकडे जाता येत असे. "गेट बंद आहे का?" तिनं चाचपडत वडिलांना विचारलं.. मी विचारलं तिच्या वडिलांना, तेव्हा समजलं "तीला जन्मापासूनच दृष्टी नाही..". मी हळहळलो.इतकी गोड मुलगी... काय वाटत असेल तिला ?ती दोघं घाटी रुग्णलयाकडे जात होते. एका छोट्याश्या ऑपरेशन नंतर ती स्वत: च्या डोळ्यांनी हे सुंदर जग बघू शकणार होती. खिशातलं चोकोलेट तिच्या हातावर ठेवलं, अजुनच वाईट वाटलं जेव्हा तिला चोकोलेटचं वेष्टन सुद्धा काढता आलं नाही !मग मीच ते काढून चोकोलेट तिला दिलं... तोपर्येन्त माझा कॉलेज आलं.. तिथच उभं राहून मी त्यांचा निरोप घेतला. त्या दोघांच्या पाठ्मोरया आक्रुतींकडे स्तब्ध होवून बघत राहिलो....तिच्या त्या निष्पाप डोळ्यांमध्ये मला एक दुर्दम्य विश्वास दिसला....एक अढळ विश्वास...