Friday, December 16, 2016

विराट ध्येय…अविचल श्रद्धेच्या ‘प्रकाशवाटा’

विराट ध्येय…अविचल श्रद्धेच्या   ‘प्रकाशवाटा’ - काही उदात्त, उत्कृष्ठ वाचायाच असेल तर खरच वाचा !
डॉ. प्रकाश आमटे - समकालीन प्रकाशन, पृष्ठे १५६ किंमत रु. २००/-    

वटवृक्षाच्या छायेत दुसरा वृक्ष रूजत नाही, असं म्हटलं जातं. बाबा आमटे नावाच्या वटवृक्षाखाली प्रकाशवृक्ष रूजला. फुलला आणि बहरला. प्रगत जगापासून दूर राहिलेल्या आदिवासांना हा प्रकाशवृक्ष मिळाला आणि हेमलकसा हे नाव जगासमोर आले. “प्रकाशवाटा’ मधून डॉ. प्रकाश आमटे यांची ही जीवनवाट उमलत जाते आणि आपण फक्त थक्क होत नाही, तर भारावून जातो. “बिकट वाट वहिवाट नसावी…’, हा मंत्र जपत सरधोपट जीवन जगणाऱ्या तुमचे-आमचे डोळे प्रकाशकार्याने दिपून जातात.

समकालीन प्रकाशनने डॉ. प्रकाश आमटे यांनी ही जीवनकथा प्रसिद्ध केली आहे आणि अत्यंत कमी बोलणारे, प्रसिद्धीपासून चार नव्हे, चाळिस हात दूर राहणारे डॉ. प्रकाश आमटे पुस्तकाच्यानिमित्ताने पहिल्यांदाच इतक्‍या मोकळेपणाने समोर येत आहेत. सत्तरनंतरच्या काळात डॉक्‍टर झालेल्या तरूणाने नोकरी-धंद्याची वाट न निवडता आदिवासींना प्रकाश दाखविण्याचे कार्य हाती घेणे, ही असामान्य घटना. एका डॉक्‍टर तरूणीने डोळे उघडे ठेवून या कार्यात आयुष्यभर साथ द्यावी, ही अलौकिक भूमिका. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांचे जीवन म्हणजे अशा असामान्य, अलौकिक घटनांचा प्रवास आहे. हे असामान्यत्व त्यांना नेहमीच “साधारण’ वाटत आले. म्हणूनच कोणताही गाजावाजा न करता तब्बल पंचविस वर्षांहून अधिक काळ डॉ. प्रकाश यांच्या सेवेत हेलमकसा न्हावून निघाले. आदिवासींना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा उजेड डॉ. प्रकाश यांनी दाखविला.
“प्रकाशवाटा’ मध्ये डॉ. आमटे सहज शैलीत जीवनातल्या अत्यंत अडचणीच्या प्रसंगांचे वर्णन करतात. साथ देणाऱ्यांविषयी कृतज्ञता त्यांच्या शब्दांमध्ये ठायीठायी दिसते. कटू अनुभवांना ते असाधारण मिश्‍किल शैलीत बाजूला लोटतात. माणसांवर त्यांची श्रद्धा आहे आणि ती टिकविण्यासाठी माणसांनीच प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, हे त्यांच्या निवेदनातून पुढे येते. प्राण्यांविषयी त्यांना प्रेम आहे. हे प्रेम त्या प्राण्यांनाही भिडावे इतके तीव्र आहे. हेमलकसामधील “आमटेज्‌ आर्क’ म्हणजे या तीव्र प्रेमाचा साक्षात्कार आहे. तो ज्यांना जाणवला, त्यांनी तो स्विकारला. या साक्षात्काराचा प्रवासही “प्रकाशवाटा’मधील अनोखे पर्व आहे.
निराशा वाटावी, असे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. ध्येय निश्‍चित असेल आणि त्यावर श्रद्धा असेल, तर निराशेची तात्कालिक परिस्थिती बाजुला हटविणे सोपे असते. “प्रकाशवाटा’ हे अशा ध्येय निश्‍चितीचा आणि अविचल श्रद्धेच्या यशाचा प्रवास आहे.
मी वाचलय.. भारावून गेलोय, तुम्ही वाचा अन मला रिप्लाय करा  
-प्रदीप ९९२३२०५६१४


चीअर्स! - प्रदीप

No comments:

Post a Comment