Thursday, June 8, 2023

शितल तुझ्या वाढदिवशी.... तुझ्यासाठी आणि तुझ्यातला माझ्यासाठी..

शितल तुझ्या वाढदिवशी.... तुझ्यासाठी 

तुझं निखळ हसणं,
तुझ्या आठवणीत चिंब भिजणं 
तुझ्यामुळे भान हरवणं, 
अन् मग तुच मला सांभाळणं...

असंच काहीसं आहे.. सारंच विलक्षण..
तुझं सदैव माझ्या सोबत असणं.. 

तुझ्या वाढदिवशी, शुभेच्छांच्या *शितल* चांदण्यात न्हाऊन निघणं,
प्रत्येक *ऋतू* त प्रत्येक क्षण... आपलं भरभरून जगणं

शितल तुझ्या वाढदिवशी.... तुझ्यासाठी 
आणि तुझ्यातला माझ्यासाठी..
~ प्रदिप

Saturday, June 3, 2023

आठवणीतल्या पाऊलखुणा...

आपण चालतच असतो... अविरत...
पाऊलखुणा मागे टाकत..
पाऊलखुणा उमटाव्या म्हणून आपण चालत नसतो
त्या आपसूकच येतात आपल्या मागोमाग

...बराचश्या पुसून जातात
पण काही उरतात... कायमच्या....
ठळक दिसतात मागे वळून पाहिलं तर
ज्या खोलवर रुतलेल्या,
पण त्यांनाही नको विसरूस
ज्या वळणांवर पुसल्या गेल्या..

तुझी पावलं पडतील यशाच्या शिखराकडे
आणि पाहशील तू मागे वळून,
माहितेय मला...
आठवशील ह्या पाऊलखुणा
तू पुन्हा विसरून ...

- प्रदीप

Saturday, May 20, 2023

अन् "पुन्हा" निश्चिंत तो झोपला...


असा हर्षला.... सुखावला
अन् निश्चिंत तो झोपला.. 

काबाड कष्टला, 
ढेकर देऊन जेवला
पैसे दोन गाठीला...
विश्वास होता, चिंता कशाला

स्वप्न पडलं एकदा 
टुमदार बंगला 
आणि सभोवती बाग बगिचा 
स्वप्नाळला, मनी रंगला 

लागला ध्यास, आस जोपासला 
बंगला आता, सुखावला
तरी खंतला 
बाग तेवढा राहीला

घेतला वसा, 
निश्चयला
विझला.... दमला,
पेटला, पुन्हा श्रमला 

रोपं अन् बिया, 
तसा तो ही फुलला
पहाता मळा बहरला
तसा मनी हरखला

लोकांनी येता पाहिला 
भेटला जो, कौतुकला 
अभिमाने ऊर भरला
पण मना काहूर दाटला

सतत चिंतला
दचकून जागला 
दुभंगला, वैतागला, 
पार वेडावला 

आंबा कुणी, फणस *"माझा"* तोडला, 
मोडून फांद्या, का नासविला,
धास्तावला, पुन्हा राबला 
जागता पहारा, कुंपणी जपला

सुखाशी अट्टाहास केला
पण तेची गमावून बसला
रडला चिडला, आक्रोशला, 
विधात्यालाच रागावला

रुसला, हिरमुसला 
किर्र जंगली गेला
तळ्याकाठी मग बसला
सावरला, जरा शांत झाला 

विचार पक्षी दिसता.. रमला 
चमकुन आत्मबोधला
मळभ दूर झाला, तिढा सुटला
प्रसन्न हसला, आल्हादला, आनंदला

खटाटोप हा केला
"स्वतःचा, माझा" जो म्हटला 
किती जिव जाळला 
उगा उरी तळमळला

विस्तिर्ण मोठा सजलेला
दैवी बाग तो पाहिला,
कसा पेरला, बहरला,
सर्वांसाठी खुला, हा कुणी राखीला?

कृतकृत्य झाला
अन् त्या पायी वाकला 
असा हर्षला.... सुखावला
अन् "पुन्हा" निश्चिंत तो झोपला.. 

©प्रदिप, पुणे
९९२३२०५६१४
दि. २ जुलै २०२२

Friday, May 19, 2023

तिची माझी (वेगळीच) लव्ह स्टोरी... ! 💕🥰

सगळ्या पहिल्या गोष्टी आपल्या हृदयाच्या कप्प्यात एक खास जागा व्यापून असतात.. हो ना?
पहीली मैत्री, पहीली शाळा, पहीली बाईक,... आणि पहिलं प्रेम?

पण आयुष्यात अशा काही घटना घडतात की ज्यांच्यावर जिवापाड प्रेम करतो त्यांच्या बद्दल परिस्थितीमुळे कठोर निर्णय घ्यावेच लागतात, नव्हे परिस्थिती तसं आपल्याला करायला भाग पाडते. 

आता ती‌ माझ्या आयुष्यातून, माझ्या पासून कुठेतरी निघून गेली होती... दुरवर.... कुठे ते माहीत नव्हतं. इतक्या वर्षात एकदाही, कुठे दिसली सुद्धा नाही.

शोधायचा प्रयत्न केला मी तीला, पण मोबाइल, फेसबुक लिंक्ड-इन च्या आधीचा जमाना होता तो.. मी हरलो होतो.
शेवटी मी तिला विसरायचं ठरवलं. 

कालांतराने माझं लग्न झालं.
संसाराच्या रगाड्यात रूळलो, मीही आता तिच्या शिवाय जगणं शिकलो होतो. 
आठवण तर नेहमीच यायची. पण ती असते कुठे काही माहिती नव्हतं. शोधावं तरी कसं? ती फेसबुक, लिंक्ड-इन वापरणार नाही हे मला पक्कं ठाऊक होतं. आणि ती स्वतः पुढाकार घेऊन माझ्याकडे यायची शक्यताच नव्हती. 
खोलवर तिची आठवण असायची.
तिच्या आठवणीत व्याकुळ होऊन मी विचार करत बसायचो 
कुठे आणि कशी असेल ती आता? 
ती आताही ती तशीच सुंदर दिसत असेल? 
कुणासोबत असेल... तिची काळजी तर घेतल्या जात असेल ना निट? 
खूप उत्सुकता असायची... 

आज जवळपास १५ वर्षांनी, ध्यानीमनी नसताना, अचानक ती समोर आली...डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
माझी तिची अशी अचानक भेट होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
भान हरपून पाहत राहिलो. हातात हात घालून, कुठं कुठं फिरायचो आम्ही .. ती सोबत असली की वेळेचं भान नसायचं. सगळे मित्र जळायचे माझ्यावर. बरेच जण बोलूनही दाखवायचे, लकी आहेस यार तु !!
खुप भारी वाटायचं. ही वेळ कधीच संपू नये असं वाटायचं. १५ वर्षांपूर्वीचा तो काळ सरकन माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेला.
दिर्घ उसासा टाकत मी तिच्याकडे एकटक बघत होतो. तिनं माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. क्षणभर मी गोंधळून गेलो 
हीच का ती?

आजही विसरू शकत नाही मी. पाडव्याच्या मंगल दिवशी.
ती पहिल्यांदा घरी आली तेव्हा उत्सवाचं वातावरण होतं. 
इतका खुश मी कधीच झालो नव्हतो. डोळे विस्फारून मी तिच्याकडे बघत राहिलो. स्वप्नवत वाटत होती ती सकाळ. 
भेट झाली, मैत्री झाली. नंतर तिच्या सोबत फिरायला गेलो नाही असा, एकही दिवस जात नव्हता. तीला थोडासुद्धा त्रास होऊ नये म्हणून मी खूप काळजी घ्यायचो. घरचे, शेजारी मित्र मला चिडवायला लागले तिच्यावरून. मला त्याची पर्वा नव्हती.

मला तिच्या सोबत नेहमीच फिरायला आवडायचं.. कदाचित तिलाही. कधी बोलून दाखवलं नाही तिनं. पण आम्हा दोघांनाही तशी कधी गरजच भासली नाही. घट्ट मैत्री होती आमची.. इतकी की 
ती सोबत नसली की लोकं विचारायचे.

आज मात्र ती खूप निराश हताश उदास वाटत होती, कदाचित तिची तब्येत ठीक नसावी. मुळीच आनंदी वाटत नव्हती. तीचा उदासवाणा चेहरा पाहून अतिशय वाईट वाटलं. प्रत्येक जण एकेकाळी तिच्या सौंदर्यावर पाहताक्षणी फिदा होत होता.. 
असं असताना, तीला आता असं निष्काळजीपणे कुणी वागवणं कसं शक्य आहे? अतीव दुःख झालं, आपलं जवळचं कुणी अशा अवस्थेत पाहणं खुप क्लेशदायक असतं...

बेभान होऊन मी तिच्या कडे धाव घेतली. 
श्वास घेणही विसरलो. तिचा हात हातात घेण्यासाठी मी हात पुढे केला आणि अचानक कुणीतरी दरडावून मला विचारलं.. "अहो मिस्टर, काय विचार आहे??" मी खाडकन् भानावर आलो. 

काय?? आता ती‌ माझी राहीली नाही?... किती दुष्ट असतं जग हे.

तीला हाक मारून बोलावंसं वाटलं, जाब विचारण्यासाठी
का केलंस असं? त्या बिचारीचा काय दोष..
तिचाही नाईलाज असावा.

तिचा अबोल स्वभाव जाणून होतो मी.
कितीही यातना सहन कराव्या लागल्या तरी ती एक शब्दही बोलणार नाही, हे मला माहीत होतं. 

क्षणभर वाटलं, झुगारून द्यावी ही व्यवहाराची बंधनं. 
आहे त्या अवस्थेत,तीला आत्ताच घेऊन जावं घरी. 
वाट्टेल ते होऊ दे...
*समाजाच्या दृष्टीनं गुन्हा ठरला असता तो.*
पण तिची अवस्था बघवत नव्हती. कुठे खरचटलं, चेहऱ्याचा रंग उडालेला, फाटलेले कपडे

मनात विचार आला, माझ्यासोबत असतीस तर अशी वेळ येऊ दिली नसती.. आणि अशी दयनीय अवस्था नसती झाली तुझी.. बिचारी... 
पण काय करणार, काही गोष्टी नशिबावर सोडून देतो आपण....

ती आणि मी आता कधीच एकत्र फिरू शकणार नाही ही जाणीव मला अस्वस्थ करतं होती. माझी नशीबानं थट्टा आज मांडली.
ती समोर असूनही मी तीला हातही लावू शकत नव्हतो.

माझी ती पहिली "बाईक" 🏍️ मिळेल का हो कधी परत मला??

हिच ती !!

Wednesday, November 23, 2022

दिखावा

"जातीव्यवस्था कशी हानीकारक आहे" ह्यावर तासभर व्याख्यान देऊन तो घरी आला.
कुत्र्याचं पिल्लू विक्रीसाठी उपलब्ध आहे असा नातेवाईकांचा फोन आला तेंव्हा त्यानं आवर्जून विचारलं "ब्रिड कुठली आहे?" 

.................................................................................................................... 

सौंदर्य असतं पहाणाऱ्याच्या नजरेत.
बाह्य सौंदर्य महत्वाचं नसतं, असं सांगून त्यानं फोन ठेवला.

काॅलनीतल्या गणपतीची आरती टाळून तो तिला घेऊन दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी निघाला.

Thursday, December 30, 2021

मातृ टिफिन सर्विस जाहिरात !


हाॅटेलमधे खाऊन कंटाळलात?
आईच्या हातच्या जेवणाची आठवण... 
मातृ टिफिन म्हणजे घरपोच घरचं जेवण...
घरचं खा आणि आरोग्य जपा !!

शुद्ध शाकाहारी सात्त्विक!
घरगुती घरपोच टिफिन सर्विस !! 

चीअर्स! - प्रदीप
दिनांक- 22/08/2019

Friday, December 16, 2016

विराट ध्येय…अविचल श्रद्धेच्या ‘प्रकाशवाटा’

विराट ध्येय…अविचल श्रद्धेच्या   ‘प्रकाशवाटा’ - काही उदात्त, उत्कृष्ठ वाचायाच असेल तर खरच वाचा !
डॉ. प्रकाश आमटे - समकालीन प्रकाशन, पृष्ठे १५६ किंमत रु. २००/-    

वटवृक्षाच्या छायेत दुसरा वृक्ष रूजत नाही, असं म्हटलं जातं. बाबा आमटे नावाच्या वटवृक्षाखाली प्रकाशवृक्ष रूजला. फुलला आणि बहरला. प्रगत जगापासून दूर राहिलेल्या आदिवासांना हा प्रकाशवृक्ष मिळाला आणि हेमलकसा हे नाव जगासमोर आले. “प्रकाशवाटा’ मधून डॉ. प्रकाश आमटे यांची ही जीवनवाट उमलत जाते आणि आपण फक्त थक्क होत नाही, तर भारावून जातो. “बिकट वाट वहिवाट नसावी…’, हा मंत्र जपत सरधोपट जीवन जगणाऱ्या तुमचे-आमचे डोळे प्रकाशकार्याने दिपून जातात.

समकालीन प्रकाशनने डॉ. प्रकाश आमटे यांनी ही जीवनकथा प्रसिद्ध केली आहे आणि अत्यंत कमी बोलणारे, प्रसिद्धीपासून चार नव्हे, चाळिस हात दूर राहणारे डॉ. प्रकाश आमटे पुस्तकाच्यानिमित्ताने पहिल्यांदाच इतक्‍या मोकळेपणाने समोर येत आहेत. सत्तरनंतरच्या काळात डॉक्‍टर झालेल्या तरूणाने नोकरी-धंद्याची वाट न निवडता आदिवासींना प्रकाश दाखविण्याचे कार्य हाती घेणे, ही असामान्य घटना. एका डॉक्‍टर तरूणीने डोळे उघडे ठेवून या कार्यात आयुष्यभर साथ द्यावी, ही अलौकिक भूमिका. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांचे जीवन म्हणजे अशा असामान्य, अलौकिक घटनांचा प्रवास आहे. हे असामान्यत्व त्यांना नेहमीच “साधारण’ वाटत आले. म्हणूनच कोणताही गाजावाजा न करता तब्बल पंचविस वर्षांहून अधिक काळ डॉ. प्रकाश यांच्या सेवेत हेलमकसा न्हावून निघाले. आदिवासींना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा उजेड डॉ. प्रकाश यांनी दाखविला.
“प्रकाशवाटा’ मध्ये डॉ. आमटे सहज शैलीत जीवनातल्या अत्यंत अडचणीच्या प्रसंगांचे वर्णन करतात. साथ देणाऱ्यांविषयी कृतज्ञता त्यांच्या शब्दांमध्ये ठायीठायी दिसते. कटू अनुभवांना ते असाधारण मिश्‍किल शैलीत बाजूला लोटतात. माणसांवर त्यांची श्रद्धा आहे आणि ती टिकविण्यासाठी माणसांनीच प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, हे त्यांच्या निवेदनातून पुढे येते. प्राण्यांविषयी त्यांना प्रेम आहे. हे प्रेम त्या प्राण्यांनाही भिडावे इतके तीव्र आहे. हेमलकसामधील “आमटेज्‌ आर्क’ म्हणजे या तीव्र प्रेमाचा साक्षात्कार आहे. तो ज्यांना जाणवला, त्यांनी तो स्विकारला. या साक्षात्काराचा प्रवासही “प्रकाशवाटा’मधील अनोखे पर्व आहे.
निराशा वाटावी, असे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. ध्येय निश्‍चित असेल आणि त्यावर श्रद्धा असेल, तर निराशेची तात्कालिक परिस्थिती बाजुला हटविणे सोपे असते. “प्रकाशवाटा’ हे अशा ध्येय निश्‍चितीचा आणि अविचल श्रद्धेच्या यशाचा प्रवास आहे.
मी वाचलय.. भारावून गेलोय, तुम्ही वाचा अन मला रिप्लाय करा  
-प्रदीप ९९२३२०५६१४


चीअर्स! - प्रदीप

Saturday, March 17, 2012

अश्या रीतीने आम्ही (मी) सुखरूप पणे ( न घाबरता) घरी पोचलो !!

दि. शुक्रवार, २० नोव्हेंबर २००९
स्थळ दरबन - साउथ आफ्रिका
लवकरच झोपावं असं वाटत होतं. कारणही तसच होतं. सकाळी अमोल आणि प्रियाला विमानतळावर सोडायला जायचा होतं. थोडं टेन्शन आलेलं. पहिल्यांदाच मी इतक्या दूर गाडी चालवून जाणार होतो. परतताना एकट्यालाच यायचा होतं. नवीन शहर, नवीन चालक .. आणि समोर होता एक नवीन थरारक अनुभव !
धाकधूक अन उत्साह. जोखीम मोठी होती माझ्या छोट्या चुकीमुळे त्या दोघांना त्रास होवू शकला असता. त्यांनी केलेल्या केपटाऊन प्रवासाचा बेत फसला असता.
पण माझा आत्मविश्वास दांडगा होता ( असं आता वाटतंय ! )
सकाळी ५ ला निघण्याच ठरलं. ७.३० ला उड्डाण होतं. दडपणामुळे रात्री ३-४ वेळा जाग आली. साडेचारला पुन्हा अचानक जाग आली अन मी घड्याळाकडे निरखून बघितलं. नंतर खिडकी बाहेर डोकावून बघितलं तर चक्क उन पडलेलं. दरबनला सूर्योदय फारच लवकर होतो हे तेव्हा कळलं . तेवढ्यात फोन वाजला. अमोल होता. मी सुद्धा लगेच उठून प्रात:विधी उरकले. अंघोळ करून निघालो. अमोल कडे गेलो तो तयारच होता. बँग्स गाडीत कोंबल्या अन मी गाडी बाहेर काढली.
माझी परीक्षा सुरु झाली ... मेलेनियम ब्रिज जवळून डावीकडे वळून, १० मिनिटांनी N-2 हाय वे वर पोचलो आणि मी (एकदाचा) पाचवा गियर टाकला अन गाडीने १२० चा वेग घेतला.
अमोल मला मधून मधून सूचना देत होता. त्या मी पुरेपूर अमलात आणण्याचा प्रयत्न करत होतो. पहिल्यांदाच विमानतळाच्या रस्त्याने मी जात असल्यामुळे शक्य तितका रस्ता लक्ष्यात ठेवत होतो.
आता दडपण जाणवत नव्हतं. रस्ता सरळच होता आणि सकाळच्या वेळी रहदारी सुद्धा नव्हती. लवकरच आम्ही विमानतळाच्या उड्डाण पुलाकडून वळलो. अमोल मी गाडी चा वेग कमी करण्यास सांगून मला परतीचा रस्ता समजावून सांगितला आणि 'हा' टर्न चुकवू नकोस असे बजावले.
मला आता छान वाटत होतं. अमोल व प्रियाने सामान चेक इन केलं. आम्ही नास्ता केला अन त्यांना बाय करून मी निघालो.. परतीच्या वाटेवर.. एकटाच .. अनोळखी रस्त्यावर ..
घाबरलो नाही आपण (फक्त भ्यायलो), मागे एका गाडीने भोंगा वाजवला अन त्या गाडीला वाट देतांना घडू नये तेच घडलं. अमोल ने दहा वेळा बजावून सांगितलेलं वळण सोडून बाजूच्या रस्त्यावरून मी गाडी वळवली .......
रस्ता ओळखीचा वाटेना ..अमोलला फोन ...त्याचा आवाज आकाशवाणी सारखा भासला "वत्सा, रस्ता चुकलास !!" सकाळच्या वेळी घाम फुटला ..
त्याच्या प्रवासाची सुरवात ह्या माझ्या गोंधळाने झाली. त्याचा जीव सुद्धा टांगणीला ...
त्याने सरळ जात राहण्याचा सल्ला दिला अन तेवढ्यात त्याला फोन बंद करावा लागला कारण त्याचं विमान उड्डाणासाठी तयार झाल्यामूळे फोन बंद करण्याची सूचना मिळाली.
माझ्यासाठी ती धोक्याची सूचना होती. ...पण मी घाबरलो नाही ...
उरलासुरला धीर आणि थरथरत्या हातानी गाडीच सुकाणू धरून मी चालवत राहिलो.
वाटलं "U" वळण मिळेल थोड्या अंतरावर .. पण माझी परीक्षा सोपी नव्हती. माझी अवस्था, इतिहासाचा अभ्यास करून गेलेल्या पण ऐनवेळी बीजगणित भूमितीची परीक्षा द्यावी लागलेल्या विद्यार्थ्यासारखी जाहली ... हाय वे असल्यामुळे कित्येक किलोमीटर पर्येंत U नव्हतं.
"Durban - City Center" असं लिहिलेला फलक दिसला म्हणून तिकडे गाडी दामटली. पण बुडत्याचे पाय खोलात...मग धडकी भरली जिकडे तिकडे गाड्याच गाड्या. असंख्य वाहतूक दिवे ...!
वाट फुटेल तिकडे जात होतो.
एका कमी गर्दीच्या ठिकाणी गाडी चा वेग कमी करून एका कृष्णवर्णीय महाभागास पुसले असता, "डावीकडून" वळून जाणेस सांगण्यात आले. तैसेची केले.
थोडे पुढे जाताच फौजदाराची दिव्यांची गाडी माझा पाठलाग करीत असल्याचे माझ्या चाणाक्ष चक्षुंनी हेरले. बहुदा एकाच दिवशी सर्व विषयांची परीक्षा देण्याची वेळ माझ्यावर आली होती.
आता मात्र मी पुरता गडबडलो ......... पण अजिबात घाबरलो नाही मी !.. (फक्त जाम भ्यायलो)
सकाळी गडबडीत माझे पारपत्र सुद्धा घरीच विसरलेलो ! ...... राम राम राम म्हणत हळूच कडी डावीकडे वळवून बस थांब्याजवळ उभी केली ... फौजदार जवळ आले .. मी मनाची पूर्ण तयारी केली अन डोळे घट्ट मिटले. माझं हृदय आता १२० च्या वेगाने धडधडत होतं.. अजून कसे खाली उतरण्यास सांगितले नाही ते बघण्यासाठी मी हळूच डोळे उघडले .. बघतो तर चमत्कार !! फौजदार गाडीसह पसार झालेले .. माझ्या नाडीचे ठोके ६० वर येईपर्यंत तिथेच थांबलो. तेवढ्यात एक मध्यमवयीन स्त्री नजरेस पडली. तीस विचारता झालो. "हे देवी !, गेट वे ह्या मा(हा)ला कडे जाण्याचे झालेस कैसे?"
धीरगंभीर आवाजात "समोरच नूतन फूटबॉलचे मैदान आहे, त्यास वळसा घालून उजवीकडे गेलेस तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील !, तथास्तु !" असे उत्तर आले.
त्या देवीस कोपरापासून नमस्कार करून मी "फेकला तटावरुनी घोडा !"
माझे मन मला मनापासून सांगत होते, आता कुठेतरी डावीकडे वळावे, पण सकाळपासून मनाने बरेच पराक्रम केल्याने मी लगाम आवरला.
शेवटी हिम्मत करून एक उजवे वळण घेतले. मग एक जंगल सदृश्य रस्ता सुरु झाला. पुन्हा एकदा रस्ता भटकल्याची भीती मनात डोकावली .
पण मी डगमगलो नाही, घाबरलो तर मुळीच नाही ..एकेरी रस्ता असल्याने U टर्न घेण्याचा मोह आवरता घ्यावा लागला.
खिन्न मनाने गाडी पळवत राहिलो, पळवत राहिलो आणि एके स्थळी हिरव्यागार झाडीतून अचानक हवेत मंद सुगंध जाणवला, पक्षी मधुर स्वरात किलबिलाट करीत आहेत, फुले हलकेच डुलत आहेत असा भास होवू लागला ...
तो भास नव्हता.... La Lucia Mall असा फलक दिसला. नकळत सिनेमातल्या नायकाप्रमाणे मी क्षणात सुकाणू फिरविले.
दुसऱ्याच क्षणी मी माझ्या ऑफिस च्या समोर होतो .. विश्वासच बसत नव्हता .. हर्षवायू होतो की काय असे वाटले .. आणि हुर्रे ..
अश्या रीतीने आम्ही (मी) सुखरूप पणे ( न घाबरता) घरी पोचलो !!
चीअर्स - प्रदीप !

माझी शाळा !

माझी शाळा !
शाळा .. नुसता शब्द्द उच्चारला तरीही साऱ्या आठवणी जाग्या होतात.
आमच्या गावात, बुलढाण्यात, तश्या बऱ्याच शाळा ... पण फुलबाग बालक मंदिरानंतर सर्वात जवळची हीच एक.
शाळा लहान .. पण शिस्तीची,

पांढरी स्वच्छ लुंगी गुंडाळून उघड्या अंगाने फिरणाऱ्या दहीगावकरांच्या भल्यामोठ्या वाड्यात भाड्याने दिलेल्या अनेक खोल्यांपैकी सहा खोल्यांमध्ये शाळेचा विस्तार.
४ इयत्ता + १ ऑफिस + १ स्टोर रूम .. आमच्या केशव नगर आणि आसपासच्या नगरांमध्ये एकमेवाद्वितीय , परंपरागत अशी ही आमची शाळा ..
 
सकाळी सुरेल आवाजात गाणारा भोंगा आम्हाला शाळेकडे खेचून आणीत असे.
येह देश है वीर जवानोकां......, इस देशकी धरती सोना उगले ... अश्या स्पुर्तीदायक गाण्यांनी आमचे चिमुकले दंड स्पुरण पावायचे. छाती पुढे काढून ऐटीत गाण्याच्या तालावर चालायचो.

शाळेची पहिली घंटा झाल्यानंतर ती ऐकून पळतच आम्ही घरातून बाहेर पडत असू.
राष्ट्रगीतानंतर वर्गात सगळ्या कवितांची घोकंपट्टी, मंदिरात तल्लीन होवून सुरु असलेल्या मंत्रोच्चारा सारखे वाटत असे.

एका तालासुरात .."नवी लकाकी .. झाडांवरती .. सुखात पाने फुले नाहती" ... ह्या कवितेतील चालीमुळे अवतरलेली नविल "काकी" झाडावरती सुखात कशी बसत असेल हे कोडे सातव्या वर्गात जाई पर्यंत मला उमगले नव्हते. कुणाच्याही काकीला कधी झाडावर चढून बसलेली मी ऐकली / बघितली नव्हती.
कविता  शिकवताना सरांनी साभिनय केलेले नृत्य अजूनही जसाच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. पावसाची कविता शिकवतांना चिंब भिजलेले सर, मोरासारखे नाचलेले आठवतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत शाळेजवळच्या मळ्यात वर्ग थाटायचे आमचे सर. 
मळ्याचा "म" उच्चारायची देर की लगेच आमची वानरसेना टणाटण उड्या मारत तीन पायाचा फळा, खुर्ची, चटया, रूळ, हजेरीच रजिस्टर, डस्टर आणि दप्तरे घेवून एका रांगेत, प्रभू रामचंद्रांच्या एका इशाऱ्या सरशी दक्षिणेकडे निघालेल्या वानरसेनेसारखी छाती फुगवून सरांच्या मागे निघायची.

फळा कुणी धरायचा, डस्टर , खुर्ची कुणाच्या ताब्यात असेल सरांचा रूळ हातात घेवून रुबाबात कोण मिरवेल, अश्या असंख्य अतिमहत्वाच्या मुद्द्यांवर वानरसेनेचे अनेक गट तयार होत.

अतिशय मानाची समजली जाणारी ही पदे भूषवण्यासाठी प्रसंगी जीवावर उदार होवून शत्रुपक्ष्यावर तुटून पडत असू.
आजकालच्या राजकीय पक्ष्यांसारखेच गटबाजी, नाराज कार्यकर्ते, बाहेरून पाठींबा देणारे, सगळ्या गोंधळात स्वतःचे हित साधणारे, सावध पवित्र घेणारे किंवा तटस्थ असणारे असे अनेक गट तयार होत.
ह्या सर्व गोंधळात अन उत्साहाच्या वातावरणात नेहमीप्रमाणे सरांच्या हातचा मार खाणारे सराईत नेते, मला इंग्रज सरकारच्या लाठ्या झेलून झेंडा खाली न पडू देणाऱ्या स्वातंत्र सैनिकांसारखे भासत. मार खावून पाठीचे धिरडे झाले तरी बेहत्तर, पण हातातले डस्टर सोडणार नाही असे निश्चयाचे महामेरू असणारे अनेक वीर आमच्या वानरसेनेत होते.

यात देवीच्या मंदिराजवळ झोपडपट्टीत राहणारा किस्ना मोरे, "मेकुडे उदंड जाहली" म्हणून लपून छपून हळूच ते खाणारी शेंबडी गंगू, अभ्यासात अतिशय हुशार आणि त्यामुळे घरचे माझी तुलना सतत ज्याच्याशी करत असत तो आशिष जैन, ऋषी कपूर ची style मारणारा महावीर माहुरकर, मोत्यांहून सुंदर अक्षर असणारा पण शुद्ध लेखनात कच्चा असणारा नंदू, चिंचोका घश्यात अडकल्यामुळे ऑपरेशननंतर अन्ननलिकेत शिट्टी बसवलेला मंग्या, सरांच्या उंचीचा, आडदांड, दादागिरी करणारा बाबा आढाव, सुगरीणींची घरटी तोडून आणणारा काळाकुट्ट फुलसुंदर, अतिशय नीटनेटकी व्यवस्थित असणारी, माझ्याशी लेखनांवरून भांडणारी वैशाली उबरहंडे, फुलासारखी नाजूक असणारी, शाळेजवळ राहणारी अंजू पंचवटकर, हरीणासारखा चपळ, दिवाळीतले कणकेचे दिवे खाणारा सचिन पाटील, महावीर नगरात राहणारा, हातात कडे घालून स्वतःला शक्तिमान समजणारा चंद्रकांत खोत, अतिशय शांत, भित्रट, तरी प्रधान आडनाव असणारा प्रशांत, सफरचंदाचे गाल असणारी "टमी" (खरं नाव राजकुमारी ) , सरांच्या हातचे फटके नेहमी खाणारा, राजेश झोड, शाळेत सराव्यतीरिक्त इस्त्रीचे कपडे घालून फिरणारा एकमेव अरुण निकम, माझ्या घराजवळ राहणारी बंजारा सिंधू, मनाविरुद्ध वागलं तर स्वतःचं डोकं भिंतीवर आपटणारी उज्वला, निळ्या डोळ्यांचा गोरापान प्रसन्न उमरकर, बालकवींची "हिरवे हिरवे गार गालिचे ..." कविता पाठ असणारा सुहास .. एक ना अनेक ....

मळ्यातून खडू आणण्यासाठी शाळेत पाठवलं तर, संजीवनी बुटी आणण्यासाठी गेलेल्या पवनपुत्र हनुमानाला मागे टाकणाऱ्या गतीने धावणारी, पाच पैकी एक खडू हळूच खिशात टाकणारी आम्ही मुले ! ;)
शिक्षा म्हणजे अजब प्रकार असे. पोटामध्ये चिमटा घेणे, वेताच्या छड्यानी हात लाल करणे, वर्गातल्या कपाटावर उभे करणे, कोंबडा करून पाठीवर खडा ठेवणे, मुलांना मुलींच्या रांगेत बसवणं असे प्रकार चालत.
कधी चुकून घरी राहिल्यास चार हट्ट्याकट्ट्या मुलांना सर उचल बांगडी करून आणावयास सांगत.
झालेली शिक्षा घरी सांगण्याचा प्रश्नच नव्हता ! घरी कळले तर अजून मार बसण्याची खात्री होती. कुणाच्याही पालकांनी तक्रार केलेली आठवत नाही ...... तक्रार केलीच तर "घरीसुद्धा हा कुणाचं ऐकत नाही, थोडं आणखी बडवून काढा " अश्या स्वरुपाची असायची !

पहाडे, पदमने आणि खक्के (काही मुलं त्यांना खप्के असं म्हणायची. त्याचं कारण नंतर कळले की ते नावाप्रमाणे खपाखप खप्के देत) ही आमची शिक्षक मंडळी !

दत्तगुरूंच पहिलं दर्शन कधी झालं ते आठवत नाही, पण ही त्रिमूर्ती अजूनही सदैव आठवणीत आहे.
कित्येक पिढ्या त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या भरवश्यावर ह्या दुनियेत सफल अन सुकर आयुष्य जगताहेत.

त्यांचा अतिप्रचंड उत्साह आणि शिकवण्याची तळमळ आजकालच्या प्रत्येक शिक्षकाला मिळावी.
जीवनभर त्यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी अशीच माझ्या सोबत राहावी आणि त्यांचे आशीर्वाद सतत पाठीशी राहावेत अशी मनापासून इच्छा !

चीअर्स! - प्रदीप

Thursday, September 22, 2011

धुंद सिंहगड

प्रिय मित्र /मैत्रिणींनो ,

...खूप विशेष नाही ...माझ्या साठी खास होता
जपून ठेवावा कालचा दिवस .... असा एक झक्कास होता.
मी आणि माझे मित्र सिंहगडला गेलो होतो ..
ते धुंद वातावरण शब्दात मांडताना मी कमी पडतो आहे
.....But I know ....u can imagine
मी सांगेल तुम्हाला ...स्वतःच तो अनुभव घेवून बघा..

पडत्या पावसात सिंहगड चढणे ...सगळीकडे कसे ओलेचिंब ..
निसर्गाची 'नशा' चढलेली........ आणि आम्ही धुंद ..
दमछाक होत-होती पण ...मजा कुछ ऐसा था .. कि पूछो मत ....( मै वैसेही बता दुंगा !! ;- )

रिमझिम पाऊस...... गरम भजे.......करवंदे...अन ...कच्ची कैरी
च्यायला height म्हणजे ......आजूबाजूला भिजलेल्या बिनधास्त पोरी ....( मर गये ! )
भिजलेल्या वाटा ......आणि आतुरलेले ढग जमिनीवर उतरलेले
बघितलं तर ..सगळ्या चिंता ..सारी दुखे: ....धुक्या सोबत विरलेले

चढताना तो घाट ...आम्ही मधेच दमलेलो...
चिखलात भरलेल्या जीन्स ...सावरत खडकावर बसलेलो
मधूनच आलेली गार वाऱ्याची झुळूक .....शहारलेलो आम्ही
मडक्यातले दही खाताना ... सारी भूक शमलेली

सब शरम छोडके .......साला अपुन भी ...बच्चेके माफिक
...वोह किचडमें खडा रहा
..पचाक करके jump मारा ... ...सोचा पब्लिक गया भाड में ..
शायद कोई गाली दिया
........ दिल में एकदम ठंडक पडा ..jump के बाद में

...माहित होतं मला मी करतोय ते चूक आहे
..तुम्हाला सांगतो पण ... तेच खरा सुख आहे
यही है जिंदगी दोस्तो......
मरने के पहिले जीना सिखलो.....
एक बार..सिंहगड जाके देखलो

-------------------------------------------------------
भगवान से दुवा करो दोस्तो .....दिल ..से ...
बस एक जिंदगी हमे और देना .....
भले उसमे लम्हे सिर्फ चार हो ....
दोस्त लेकीन हजार देना ...
-------------------------------------------------------
Ya it's..
PraDeep









Wednesday, August 11, 2010

ऋतूचा पहिला वाढदिवस !

एक वर्ष झाला सुद्धा ?
काय सांगताय? आश्चर्य आहे....

आत्ता तर ऋतू आईच्या उबदार कुशीत पहुडलेला बघितला होता...

ज्याच्या इवल्या सोनपावलांनी आमच्या घरात
चैतन्याची चौफेर उधळण केलीये ..
ज्याच्या चिमण्या आरोळ्यांनी घर दणाणून गेलंय,
आई बाबांना परत एकदा लहान मुल बनवलंय,
बघता बघता एक वर्ष सरलं सुद्धा !

लाडोबाचे लाड करताना आजोबा आज्जी दमून जातात,
आत्या मावश्या कौतुकाचा वर्षाव करताना थकतात,
काका काकू सगळे श्रम विसरून जातात
ताई- दादा आपली ताईगिरी दादागिरी मिरवायला सज्ज होतात...

जमुयात सगळे पुन्हा, येत्या बुधवारी 
अन मज्जा करूया एकदम भारी 
२५- ऑगस्टला याल ना घरी 
स्थळ तेच, आपली "शिवनगरी" ...

नात आपल जुनंच जरी 
वाटायला हव ना सदैव नव ?
निमित्त्य कुठलही असुद्या हो ..
Celebration तर हवंच हव ...

त्या सुवर्णक्षणांना उजाळा देण्यासाठी,
आशीर्वादांच्या सरीमध्ये चिंब भिजण्यासाठी,
ऋतुराजचा पहिला वाढदिवस !

२५ ऑगस्ट, २०१०, संध्याकाळी ६:३० ला,
ब-१८, शिव नगरी, महात्मा सोसायटी,
कोथरूड.
भ्रमण ध्वनी : ९९२३२०५६१३/४

Sunday, February 21, 2010

माझं मन

तुझ्यासमोर नेहमी हसणारा मी कधी अश्रू ढाळताना आढळलो तर आश्चर्य वाटून घेवू नकोस...
उसनं अवसान आणून हसणं शिकलोय मी कधीच,
प्रत्येकवेळी समोरच्याला हसवतांना,
मी फसवत असतो स्वताला
मुरड घालण्याची सवयच झालीय
आता माझ्या मनाला..

- प्रदीप

फुलं सुकतील कदाचित...

ही फुलं सुकली असतील कदाचित,
पण त्यामागच्या भावना सुकणार नाहीत कधीच,
ह्यांचा सुगंध नसेल दरवळत आता,
पण धुंद करून गेलाय कधीतरी तो।


रंग फिके पडले असतील कदाचित,
पण अंतरंग बघ ते विटणार नाहीत कधीच,

कारण प्रत्येक फुलाला माहित असतं,
एक दिवस येणार,
क्षणिक सुखाचा सुगंध सांडून
आपण अन सुकणार.

तरीही प्रत्येक  फुल,
नव्या उमेदीनं फुलतं
सुगंध उधळत चहू दिशांना ,
मंद हवेवर झुलतं...

- प्रदीप

माझ्या चारोळ्या!

तुझ्यावरच्या विश्वासाला,
पुरावा नकोय मला,
माझा माझ्यावरचाच विश्वास,
उडत चाललाय हल्ली !
- प्रदीप

माझी कविता

शब्द लगेच दिसून येत नाहीत,
त्यासाठी दुखः थोडं हलक व्हावं लागतं,
रातराणी सारखं ते उमलून यावं लागतं,
त्या मुग्ध सुगंधात सार सार सुसह्य होतं,


आयुष्याच्या पहाटे जुळलेल्या
ह्या दोन ओळी मी जीवापाड जपेल,
मला कुठे ठावूक होतं तुझं असणं,
हीच माझी कविता असेल।


- प्रदीप

Saturday, February 20, 2010

आयुष्य..

आयुष्य खूप थोडं आहे
म्हटलं तर क्षणाचं,
आयुष्य म्हणजे तळ आहे
हातावरल्या थेंबांच,

आयुष्य म्हणजे स्वप्नं आहे,
आतुरलेल्या कुणाचं,
आयुष्य म्हणजे गोड गाणं,
स्वच्छंद मनाचं.

आयुष्य म्हणजे जग नाही,
तुझं माझं दोघांचं,
आयुष्य म्हणजे चित्र नाही
फक्त दोन रेघांच

अवखळ उघड्या वाटेवरती
गडगडणार्या मेघांच,
आयुष्य म्हणजे तुफान वारं
बेधुंदीच्या वेडाच

सुख म्हणजे हिरवी वाट,
स्वप्नातल्या सत्त्याची,
दुखः म्हणजे केवळ राख,
मनामधल्या हत्त्यांची.

सुख म्हणजे वेडी आशा,
खळाळणार्या ओढ्याची,
कड्यावरून स्वतःला
झोकणाऱ्या वेड्याची.

सुख असं भोगताना,
जाणीव असु दे दुःखाची,
दुःखाच जर केलास गाणं
गरजच काय सुखाची?

- प्रदीप

Saturday, January 9, 2010

राहून गेलेल्या गोष्टी !

राहून गेलेल्या गोष्टी !

- लहानशी विहीर खणून केलेली शेती.
-ज्वारीच्या धांडयाची बैलगाड़ी.
-पावसाळ्यात खुपसनिचा खेळ.
-मातीच्या गोळ्यांचा बोंम्ब हल्ला
-सुरपारम्ब्यांचा खेळ
-दिवाळीचा किल्ला
-गणपति बाप्पाची हातानी केलेली मूर्ति
- धामण दरी मधील बोरे चिंचा चारं जांभूळ कैरया ऊसं गोळा करायला जायचंय
- गुर्हाळात जावून आलं टाकलेला उसाचा रस अन गरमागरम गुळ खायचाय.
-आज्जीबाई तूप लोणी चा खेळ
-लगोरी, लंगडी, सागरगोटे इ.
-घरी न सांगता पोहायला जायचंय.
-स्केटिंग करायचं
-तान्हा पोळा साजरा करायचाय.
-दसऱ्याला रावण दहन करायचंय
- पोटभर गरमागरम कांदेपोहे / उकडीचे मोदक खायचे आहेत
- उन्हात तहानभूक विसरून क्रिकेट खेलायचय.
-पडत्या पावसात निसरड्या चिखलात फुटबाल खेळायचाय.
-उबदार गोधडीत शिरून खिडकीतला मुसळधार पाऊस बघायचाय
-लपंडावाचा राज्य घ्यायचाय ... आठवडाभर :)
-बांबू पासून धनुष्य बाण बनवून "रामायण" स्टाईल लढाई करायचीये
-चोर पोलीस खेळत गावभर फिरायचय.
- प्राथमिक शाळेतल्या सरांना शाळेत जावून भेटायचय... पायाला हात लावून नमस्कार करत सांगायचय.. ह्याच वर्गात बसून मार खाल्लाय तुमच्या हातचा :)



चीअर्स!
- प्रदीप

Friday, January 1, 2010

एक दुर्दम्य विश्वास

मी SB कॉलेज ला लेक्चरर असतांनाची गोष्ट !सकाळी ७:३० चं लेक्चर होतं म्हणून झपझप पावलं उचलत मी कॉलेज कड़े जात होतो.एक छोटी चुणचुणित मुलगी उड्या मारत तिच्या वडिलांचा हात धरून रस्त्याच्या कडेने माझ्यासोबत येत होती. मी कौतुकाने तिच्याकड़े बघत होतो. खुप गप्पा मारत होती ती गोड मुलगी..असेच चालत चालत आम्ही कॉलेज च्या लोखंडी गेट जवळ आलो.गेट नेहमी बंदच असायचं, पण गेटला एक छोटी खिड़की होती तीमधून पलिकडे जाता येत असे. "गेट बंद आहे का?" तिनं चाचपडत वडिलांना विचारलं.. मी विचारलं तिच्या वडिलांना, तेव्हा समजलं "तीला जन्मापासूनच दृष्टी नाही..". मी हळहळलो.इतकी गोड मुलगी... काय वाटत असेल तिला ?ती दोघं घाटी रुग्णलयाकडे जात होते. एका छोट्याश्या ऑपरेशन नंतर ती स्वत: च्या डोळ्यांनी हे सुंदर जग बघू शकणार होती. खिशातलं चोकोलेट तिच्या हातावर ठेवलं, अजुनच वाईट वाटलं जेव्हा तिला चोकोलेटचं वेष्टन सुद्धा काढता आलं नाही !मग मीच ते काढून चोकोलेट तिला दिलं... तोपर्येन्त माझा कॉलेज आलं.. तिथच उभं राहून मी त्यांचा निरोप घेतला. त्या दोघांच्या पाठ्मोरया आक्रुतींकडे स्तब्ध होवून बघत राहिलो....तिच्या त्या निष्पाप डोळ्यांमध्ये मला एक दुर्दम्य विश्वास दिसला....एक अढळ विश्वास...