Saturday, March 17, 2012

अश्या रीतीने आम्ही (मी) सुखरूप पणे ( न घाबरता) घरी पोचलो !!

दि. शुक्रवार, २० नोव्हेंबर २००९
स्थळ दरबन - साउथ आफ्रिका
लवकरच झोपावं असं वाटत होतं. कारणही तसच होतं. सकाळी अमोल आणि प्रियाला विमानतळावर सोडायला जायचा होतं. थोडं टेन्शन आलेलं. पहिल्यांदाच मी इतक्या दूर गाडी चालवून जाणार होतो. परतताना एकट्यालाच यायचा होतं. नवीन शहर, नवीन चालक .. आणि समोर होता एक नवीन थरारक अनुभव !
धाकधूक अन उत्साह. जोखीम मोठी होती माझ्या छोट्या चुकीमुळे त्या दोघांना त्रास होवू शकला असता. त्यांनी केलेल्या केपटाऊन प्रवासाचा बेत फसला असता.
पण माझा आत्मविश्वास दांडगा होता ( असं आता वाटतंय ! )
सकाळी ५ ला निघण्याच ठरलं. ७.३० ला उड्डाण होतं. दडपणामुळे रात्री ३-४ वेळा जाग आली. साडेचारला पुन्हा अचानक जाग आली अन मी घड्याळाकडे निरखून बघितलं. नंतर खिडकी बाहेर डोकावून बघितलं तर चक्क उन पडलेलं. दरबनला सूर्योदय फारच लवकर होतो हे तेव्हा कळलं . तेवढ्यात फोन वाजला. अमोल होता. मी सुद्धा लगेच उठून प्रात:विधी उरकले. अंघोळ करून निघालो. अमोल कडे गेलो तो तयारच होता. बँग्स गाडीत कोंबल्या अन मी गाडी बाहेर काढली.
माझी परीक्षा सुरु झाली ... मेलेनियम ब्रिज जवळून डावीकडे वळून, १० मिनिटांनी N-2 हाय वे वर पोचलो आणि मी (एकदाचा) पाचवा गियर टाकला अन गाडीने १२० चा वेग घेतला.
अमोल मला मधून मधून सूचना देत होता. त्या मी पुरेपूर अमलात आणण्याचा प्रयत्न करत होतो. पहिल्यांदाच विमानतळाच्या रस्त्याने मी जात असल्यामुळे शक्य तितका रस्ता लक्ष्यात ठेवत होतो.
आता दडपण जाणवत नव्हतं. रस्ता सरळच होता आणि सकाळच्या वेळी रहदारी सुद्धा नव्हती. लवकरच आम्ही विमानतळाच्या उड्डाण पुलाकडून वळलो. अमोल मी गाडी चा वेग कमी करण्यास सांगून मला परतीचा रस्ता समजावून सांगितला आणि 'हा' टर्न चुकवू नकोस असे बजावले.
मला आता छान वाटत होतं. अमोल व प्रियाने सामान चेक इन केलं. आम्ही नास्ता केला अन त्यांना बाय करून मी निघालो.. परतीच्या वाटेवर.. एकटाच .. अनोळखी रस्त्यावर ..
घाबरलो नाही आपण (फक्त भ्यायलो), मागे एका गाडीने भोंगा वाजवला अन त्या गाडीला वाट देतांना घडू नये तेच घडलं. अमोल ने दहा वेळा बजावून सांगितलेलं वळण सोडून बाजूच्या रस्त्यावरून मी गाडी वळवली .......
रस्ता ओळखीचा वाटेना ..अमोलला फोन ...त्याचा आवाज आकाशवाणी सारखा भासला "वत्सा, रस्ता चुकलास !!" सकाळच्या वेळी घाम फुटला ..
त्याच्या प्रवासाची सुरवात ह्या माझ्या गोंधळाने झाली. त्याचा जीव सुद्धा टांगणीला ...
त्याने सरळ जात राहण्याचा सल्ला दिला अन तेवढ्यात त्याला फोन बंद करावा लागला कारण त्याचं विमान उड्डाणासाठी तयार झाल्यामूळे फोन बंद करण्याची सूचना मिळाली.
माझ्यासाठी ती धोक्याची सूचना होती. ...पण मी घाबरलो नाही ...
उरलासुरला धीर आणि थरथरत्या हातानी गाडीच सुकाणू धरून मी चालवत राहिलो.
वाटलं "U" वळण मिळेल थोड्या अंतरावर .. पण माझी परीक्षा सोपी नव्हती. माझी अवस्था, इतिहासाचा अभ्यास करून गेलेल्या पण ऐनवेळी बीजगणित भूमितीची परीक्षा द्यावी लागलेल्या विद्यार्थ्यासारखी जाहली ... हाय वे असल्यामुळे कित्येक किलोमीटर पर्येंत U नव्हतं.
"Durban - City Center" असं लिहिलेला फलक दिसला म्हणून तिकडे गाडी दामटली. पण बुडत्याचे पाय खोलात...मग धडकी भरली जिकडे तिकडे गाड्याच गाड्या. असंख्य वाहतूक दिवे ...!
वाट फुटेल तिकडे जात होतो.
एका कमी गर्दीच्या ठिकाणी गाडी चा वेग कमी करून एका कृष्णवर्णीय महाभागास पुसले असता, "डावीकडून" वळून जाणेस सांगण्यात आले. तैसेची केले.
थोडे पुढे जाताच फौजदाराची दिव्यांची गाडी माझा पाठलाग करीत असल्याचे माझ्या चाणाक्ष चक्षुंनी हेरले. बहुदा एकाच दिवशी सर्व विषयांची परीक्षा देण्याची वेळ माझ्यावर आली होती.
आता मात्र मी पुरता गडबडलो ......... पण अजिबात घाबरलो नाही मी !.. (फक्त जाम भ्यायलो)
सकाळी गडबडीत माझे पारपत्र सुद्धा घरीच विसरलेलो ! ...... राम राम राम म्हणत हळूच कडी डावीकडे वळवून बस थांब्याजवळ उभी केली ... फौजदार जवळ आले .. मी मनाची पूर्ण तयारी केली अन डोळे घट्ट मिटले. माझं हृदय आता १२० च्या वेगाने धडधडत होतं.. अजून कसे खाली उतरण्यास सांगितले नाही ते बघण्यासाठी मी हळूच डोळे उघडले .. बघतो तर चमत्कार !! फौजदार गाडीसह पसार झालेले .. माझ्या नाडीचे ठोके ६० वर येईपर्यंत तिथेच थांबलो. तेवढ्यात एक मध्यमवयीन स्त्री नजरेस पडली. तीस विचारता झालो. "हे देवी !, गेट वे ह्या मा(हा)ला कडे जाण्याचे झालेस कैसे?"
धीरगंभीर आवाजात "समोरच नूतन फूटबॉलचे मैदान आहे, त्यास वळसा घालून उजवीकडे गेलेस तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील !, तथास्तु !" असे उत्तर आले.
त्या देवीस कोपरापासून नमस्कार करून मी "फेकला तटावरुनी घोडा !"
माझे मन मला मनापासून सांगत होते, आता कुठेतरी डावीकडे वळावे, पण सकाळपासून मनाने बरेच पराक्रम केल्याने मी लगाम आवरला.
शेवटी हिम्मत करून एक उजवे वळण घेतले. मग एक जंगल सदृश्य रस्ता सुरु झाला. पुन्हा एकदा रस्ता भटकल्याची भीती मनात डोकावली .
पण मी डगमगलो नाही, घाबरलो तर मुळीच नाही ..एकेरी रस्ता असल्याने U टर्न घेण्याचा मोह आवरता घ्यावा लागला.
खिन्न मनाने गाडी पळवत राहिलो, पळवत राहिलो आणि एके स्थळी हिरव्यागार झाडीतून अचानक हवेत मंद सुगंध जाणवला, पक्षी मधुर स्वरात किलबिलाट करीत आहेत, फुले हलकेच डुलत आहेत असा भास होवू लागला ...
तो भास नव्हता.... La Lucia Mall असा फलक दिसला. नकळत सिनेमातल्या नायकाप्रमाणे मी क्षणात सुकाणू फिरविले.
दुसऱ्याच क्षणी मी माझ्या ऑफिस च्या समोर होतो .. विश्वासच बसत नव्हता .. हर्षवायू होतो की काय असे वाटले .. आणि हुर्रे ..
अश्या रीतीने आम्ही (मी) सुखरूप पणे ( न घाबरता) घरी पोचलो !!
चीअर्स - प्रदीप !

3 comments: