Saturday, March 17, 2012

माझी शाळा !

माझी शाळा !
शाळा .. नुसता शब्द्द उच्चारला तरीही साऱ्या आठवणी जाग्या होतात.
आमच्या गावात, बुलढाण्यात, तश्या बऱ्याच शाळा ... पण फुलबाग बालक मंदिरानंतर सर्वात जवळची हीच एक.
शाळा लहान .. पण शिस्तीची,

पांढरी स्वच्छ लुंगी गुंडाळून उघड्या अंगाने फिरणाऱ्या दहीगावकरांच्या भल्यामोठ्या वाड्यात भाड्याने दिलेल्या अनेक खोल्यांपैकी सहा खोल्यांमध्ये शाळेचा विस्तार.
४ इयत्ता + १ ऑफिस + १ स्टोर रूम .. आमच्या केशव नगर आणि आसपासच्या नगरांमध्ये एकमेवाद्वितीय , परंपरागत अशी ही आमची शाळा ..
 
सकाळी सुरेल आवाजात गाणारा भोंगा आम्हाला शाळेकडे खेचून आणीत असे.
येह देश है वीर जवानोकां......, इस देशकी धरती सोना उगले ... अश्या स्पुर्तीदायक गाण्यांनी आमचे चिमुकले दंड स्पुरण पावायचे. छाती पुढे काढून ऐटीत गाण्याच्या तालावर चालायचो.

शाळेची पहिली घंटा झाल्यानंतर ती ऐकून पळतच आम्ही घरातून बाहेर पडत असू.
राष्ट्रगीतानंतर वर्गात सगळ्या कवितांची घोकंपट्टी, मंदिरात तल्लीन होवून सुरु असलेल्या मंत्रोच्चारा सारखे वाटत असे.

एका तालासुरात .."नवी लकाकी .. झाडांवरती .. सुखात पाने फुले नाहती" ... ह्या कवितेतील चालीमुळे अवतरलेली नविल "काकी" झाडावरती सुखात कशी बसत असेल हे कोडे सातव्या वर्गात जाई पर्यंत मला उमगले नव्हते. कुणाच्याही काकीला कधी झाडावर चढून बसलेली मी ऐकली / बघितली नव्हती.
कविता  शिकवताना सरांनी साभिनय केलेले नृत्य अजूनही जसाच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. पावसाची कविता शिकवतांना चिंब भिजलेले सर, मोरासारखे नाचलेले आठवतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत शाळेजवळच्या मळ्यात वर्ग थाटायचे आमचे सर. 
मळ्याचा "म" उच्चारायची देर की लगेच आमची वानरसेना टणाटण उड्या मारत तीन पायाचा फळा, खुर्ची, चटया, रूळ, हजेरीच रजिस्टर, डस्टर आणि दप्तरे घेवून एका रांगेत, प्रभू रामचंद्रांच्या एका इशाऱ्या सरशी दक्षिणेकडे निघालेल्या वानरसेनेसारखी छाती फुगवून सरांच्या मागे निघायची.

फळा कुणी धरायचा, डस्टर , खुर्ची कुणाच्या ताब्यात असेल सरांचा रूळ हातात घेवून रुबाबात कोण मिरवेल, अश्या असंख्य अतिमहत्वाच्या मुद्द्यांवर वानरसेनेचे अनेक गट तयार होत.

अतिशय मानाची समजली जाणारी ही पदे भूषवण्यासाठी प्रसंगी जीवावर उदार होवून शत्रुपक्ष्यावर तुटून पडत असू.
आजकालच्या राजकीय पक्ष्यांसारखेच गटबाजी, नाराज कार्यकर्ते, बाहेरून पाठींबा देणारे, सगळ्या गोंधळात स्वतःचे हित साधणारे, सावध पवित्र घेणारे किंवा तटस्थ असणारे असे अनेक गट तयार होत.
ह्या सर्व गोंधळात अन उत्साहाच्या वातावरणात नेहमीप्रमाणे सरांच्या हातचा मार खाणारे सराईत नेते, मला इंग्रज सरकारच्या लाठ्या झेलून झेंडा खाली न पडू देणाऱ्या स्वातंत्र सैनिकांसारखे भासत. मार खावून पाठीचे धिरडे झाले तरी बेहत्तर, पण हातातले डस्टर सोडणार नाही असे निश्चयाचे महामेरू असणारे अनेक वीर आमच्या वानरसेनेत होते.

यात देवीच्या मंदिराजवळ झोपडपट्टीत राहणारा किस्ना मोरे, "मेकुडे उदंड जाहली" म्हणून लपून छपून हळूच ते खाणारी शेंबडी गंगू, अभ्यासात अतिशय हुशार आणि त्यामुळे घरचे माझी तुलना सतत ज्याच्याशी करत असत तो आशिष जैन, ऋषी कपूर ची style मारणारा महावीर माहुरकर, मोत्यांहून सुंदर अक्षर असणारा पण शुद्ध लेखनात कच्चा असणारा नंदू, चिंचोका घश्यात अडकल्यामुळे ऑपरेशननंतर अन्ननलिकेत शिट्टी बसवलेला मंग्या, सरांच्या उंचीचा, आडदांड, दादागिरी करणारा बाबा आढाव, सुगरीणींची घरटी तोडून आणणारा काळाकुट्ट फुलसुंदर, अतिशय नीटनेटकी व्यवस्थित असणारी, माझ्याशी लेखनांवरून भांडणारी वैशाली उबरहंडे, फुलासारखी नाजूक असणारी, शाळेजवळ राहणारी अंजू पंचवटकर, हरीणासारखा चपळ, दिवाळीतले कणकेचे दिवे खाणारा सचिन पाटील, महावीर नगरात राहणारा, हातात कडे घालून स्वतःला शक्तिमान समजणारा चंद्रकांत खोत, अतिशय शांत, भित्रट, तरी प्रधान आडनाव असणारा प्रशांत, सफरचंदाचे गाल असणारी "टमी" (खरं नाव राजकुमारी ) , सरांच्या हातचे फटके नेहमी खाणारा, राजेश झोड, शाळेत सराव्यतीरिक्त इस्त्रीचे कपडे घालून फिरणारा एकमेव अरुण निकम, माझ्या घराजवळ राहणारी बंजारा सिंधू, मनाविरुद्ध वागलं तर स्वतःचं डोकं भिंतीवर आपटणारी उज्वला, निळ्या डोळ्यांचा गोरापान प्रसन्न उमरकर, बालकवींची "हिरवे हिरवे गार गालिचे ..." कविता पाठ असणारा सुहास .. एक ना अनेक ....

मळ्यातून खडू आणण्यासाठी शाळेत पाठवलं तर, संजीवनी बुटी आणण्यासाठी गेलेल्या पवनपुत्र हनुमानाला मागे टाकणाऱ्या गतीने धावणारी, पाच पैकी एक खडू हळूच खिशात टाकणारी आम्ही मुले ! ;)
शिक्षा म्हणजे अजब प्रकार असे. पोटामध्ये चिमटा घेणे, वेताच्या छड्यानी हात लाल करणे, वर्गातल्या कपाटावर उभे करणे, कोंबडा करून पाठीवर खडा ठेवणे, मुलांना मुलींच्या रांगेत बसवणं असे प्रकार चालत.
कधी चुकून घरी राहिल्यास चार हट्ट्याकट्ट्या मुलांना सर उचल बांगडी करून आणावयास सांगत.
झालेली शिक्षा घरी सांगण्याचा प्रश्नच नव्हता ! घरी कळले तर अजून मार बसण्याची खात्री होती. कुणाच्याही पालकांनी तक्रार केलेली आठवत नाही ...... तक्रार केलीच तर "घरीसुद्धा हा कुणाचं ऐकत नाही, थोडं आणखी बडवून काढा " अश्या स्वरुपाची असायची !

पहाडे, पदमने आणि खक्के (काही मुलं त्यांना खप्के असं म्हणायची. त्याचं कारण नंतर कळले की ते नावाप्रमाणे खपाखप खप्के देत) ही आमची शिक्षक मंडळी !

दत्तगुरूंच पहिलं दर्शन कधी झालं ते आठवत नाही, पण ही त्रिमूर्ती अजूनही सदैव आठवणीत आहे.
कित्येक पिढ्या त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या भरवश्यावर ह्या दुनियेत सफल अन सुकर आयुष्य जगताहेत.

त्यांचा अतिप्रचंड उत्साह आणि शिकवण्याची तळमळ आजकालच्या प्रत्येक शिक्षकाला मिळावी.
जीवनभर त्यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी अशीच माझ्या सोबत राहावी आणि त्यांचे आशीर्वाद सतत पाठीशी राहावेत अशी मनापासून इच्छा !

चीअर्स! - प्रदीप

4 comments: