Friday, May 19, 2023

तिची माझी (वेगळीच) लव्ह स्टोरी... ! 💕🥰

सगळ्या पहिल्या गोष्टी आपल्या हृदयाच्या कप्प्यात एक खास जागा व्यापून असतात.. हो ना?
पहीली मैत्री, पहीली शाळा, पहीली बाईक,... आणि पहिलं प्रेम?

पण आयुष्यात अशा काही घटना घडतात की ज्यांच्यावर जिवापाड प्रेम करतो त्यांच्या बद्दल परिस्थितीमुळे कठोर निर्णय घ्यावेच लागतात, नव्हे परिस्थिती तसं आपल्याला करायला भाग पाडते. 

आता ती‌ माझ्या आयुष्यातून, माझ्या पासून कुठेतरी निघून गेली होती... दुरवर.... कुठे ते माहीत नव्हतं. इतक्या वर्षात एकदाही, कुठे दिसली सुद्धा नाही.

शोधायचा प्रयत्न केला मी तीला, पण मोबाइल, फेसबुक लिंक्ड-इन च्या आधीचा जमाना होता तो.. मी हरलो होतो.
शेवटी मी तिला विसरायचं ठरवलं. 

कालांतराने माझं लग्न झालं.
संसाराच्या रगाड्यात रूळलो, मीही आता तिच्या शिवाय जगणं शिकलो होतो. 
आठवण तर नेहमीच यायची. पण ती असते कुठे काही माहिती नव्हतं. शोधावं तरी कसं? ती फेसबुक, लिंक्ड-इन वापरणार नाही हे मला पक्कं ठाऊक होतं. आणि ती स्वतः पुढाकार घेऊन माझ्याकडे यायची शक्यताच नव्हती. 
खोलवर तिची आठवण असायची.
तिच्या आठवणीत व्याकुळ होऊन मी विचार करत बसायचो 
कुठे आणि कशी असेल ती आता? 
ती आताही ती तशीच सुंदर दिसत असेल? 
कुणासोबत असेल... तिची काळजी तर घेतल्या जात असेल ना निट? 
खूप उत्सुकता असायची... 

आज जवळपास १५ वर्षांनी, ध्यानीमनी नसताना, अचानक ती समोर आली...डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
माझी तिची अशी अचानक भेट होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
भान हरपून पाहत राहिलो. हातात हात घालून, कुठं कुठं फिरायचो आम्ही .. ती सोबत असली की वेळेचं भान नसायचं. सगळे मित्र जळायचे माझ्यावर. बरेच जण बोलूनही दाखवायचे, लकी आहेस यार तु !!
खुप भारी वाटायचं. ही वेळ कधीच संपू नये असं वाटायचं. १५ वर्षांपूर्वीचा तो काळ सरकन माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेला.
दिर्घ उसासा टाकत मी तिच्याकडे एकटक बघत होतो. तिनं माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. क्षणभर मी गोंधळून गेलो 
हीच का ती?

आजही विसरू शकत नाही मी. पाडव्याच्या मंगल दिवशी.
ती पहिल्यांदा घरी आली तेव्हा उत्सवाचं वातावरण होतं. 
इतका खुश मी कधीच झालो नव्हतो. डोळे विस्फारून मी तिच्याकडे बघत राहिलो. स्वप्नवत वाटत होती ती सकाळ. 
भेट झाली, मैत्री झाली. नंतर तिच्या सोबत फिरायला गेलो नाही असा, एकही दिवस जात नव्हता. तीला थोडासुद्धा त्रास होऊ नये म्हणून मी खूप काळजी घ्यायचो. घरचे, शेजारी मित्र मला चिडवायला लागले तिच्यावरून. मला त्याची पर्वा नव्हती.

मला तिच्या सोबत नेहमीच फिरायला आवडायचं.. कदाचित तिलाही. कधी बोलून दाखवलं नाही तिनं. पण आम्हा दोघांनाही तशी कधी गरजच भासली नाही. घट्ट मैत्री होती आमची.. इतकी की 
ती सोबत नसली की लोकं विचारायचे.

आज मात्र ती खूप निराश हताश उदास वाटत होती, कदाचित तिची तब्येत ठीक नसावी. मुळीच आनंदी वाटत नव्हती. तीचा उदासवाणा चेहरा पाहून अतिशय वाईट वाटलं. प्रत्येक जण एकेकाळी तिच्या सौंदर्यावर पाहताक्षणी फिदा होत होता.. 
असं असताना, तीला आता असं निष्काळजीपणे कुणी वागवणं कसं शक्य आहे? अतीव दुःख झालं, आपलं जवळचं कुणी अशा अवस्थेत पाहणं खुप क्लेशदायक असतं...

बेभान होऊन मी तिच्या कडे धाव घेतली. 
श्वास घेणही विसरलो. तिचा हात हातात घेण्यासाठी मी हात पुढे केला आणि अचानक कुणीतरी दरडावून मला विचारलं.. "अहो मिस्टर, काय विचार आहे??" मी खाडकन् भानावर आलो. 

काय?? आता ती‌ माझी राहीली नाही?... किती दुष्ट असतं जग हे.

तीला हाक मारून बोलावंसं वाटलं, जाब विचारण्यासाठी
का केलंस असं? त्या बिचारीचा काय दोष..
तिचाही नाईलाज असावा.

तिचा अबोल स्वभाव जाणून होतो मी.
कितीही यातना सहन कराव्या लागल्या तरी ती एक शब्दही बोलणार नाही, हे मला माहीत होतं. 

क्षणभर वाटलं, झुगारून द्यावी ही व्यवहाराची बंधनं. 
आहे त्या अवस्थेत,तीला आत्ताच घेऊन जावं घरी. 
वाट्टेल ते होऊ दे...
*समाजाच्या दृष्टीनं गुन्हा ठरला असता तो.*
पण तिची अवस्था बघवत नव्हती. कुठे खरचटलं, चेहऱ्याचा रंग उडालेला, फाटलेले कपडे

मनात विचार आला, माझ्यासोबत असतीस तर अशी वेळ येऊ दिली नसती.. आणि अशी दयनीय अवस्था नसती झाली तुझी.. बिचारी... 
पण काय करणार, काही गोष्टी नशिबावर सोडून देतो आपण....

ती आणि मी आता कधीच एकत्र फिरू शकणार नाही ही जाणीव मला अस्वस्थ करतं होती. माझी नशीबानं थट्टा आज मांडली.
ती समोर असूनही मी तीला हातही लावू शकत नव्हतो.

माझी ती पहिली "बाईक" 🏍️ मिळेल का हो कधी परत मला??

हिच ती !!

1 comment: